Sunday, 1 September 2019

आधुनिक काळ आणि हरतालिकेचं व्रत.


रेणुका कल्पना


हिमालयाची कन्या पार्वती ही उपवर झाल्यावर तिच्या पित्याने तिच्यासाठी पती म्हणून विष्णूची निवड केली. विष्णूशी लग्न करायचं नाही म्हणून पार्वती वनात पळून गेली. तिकडे झाडाची पान सोडल्यास आणखी काहीही न खाता, पाण्याचा थेंबही न पिता तिने वनात बसून कठोर व्रत केलं. त्यावर शंकर तिला प्रसन्न झाला. पार्वतीने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या तपश्चर्येवर शंकर खूष झाला असल्याने त्याने ती मान्य केली.  म्हणून चांगला आणि हवा  तो पती मिळावा यासाठी पार्वतीने केलं ते हरतालिकेचे व्रत सर्व कुमारिकांनी करावं, पूजा मांडावी, त्याला सात प्रकारच्या पत्री वहाव्यात,  उपवास करावा अशी प्रथा पडली.

   - हरतालिकेची ही कथा आई प्रत्येक वर्षी वाचत असे. पण यावेळी मात्र ती ऐकताना नुसतीच कानावर पडत नव्हती. तिच्यातले वेगवेगळे गाभार्थ कळत होते. उसनी सजगता आणून ती गोष्ट पुन्हा पुन्हा वाचावी असं वाटत होतं.

कोणतंही मिथक हे अज्ञानातून पुढे आलेलं असत. अश्याच एका नॉर्वेईन मिथकाची एक गोष्ट! पाऊस पडून गेल्यावर अचानक वांझ पृथ्वीला कोंब कुठून येतात, हे बदल होतात तर का होतात अश्या प्रश्नांची उत्तरं ह्या नॉर्वेईन लोकांना कळत नव्हती. त्यांना बस इतकं कळत होतं की हा पाऊस आपल्या पिकांसाठी आणि परिणामी जगण्यासाठी गरजेचा आहे. म्हणून  या नॉर्वेईन लोकांनी एक मिथक रचलं. थोर नावाचा त्यांचा देव. हातोडा, हॅमर हे त्याचं शस्त्र. जेव्हा थोर हॅमर चालवत असतो तेव्हा आकाशात युद्ध चालू असत. आणि म्हणून आकाशात विजेचा कडकडाट होतो असं या नॉर्वेईन लोकांना वाटायचं. तर, सांगायचा मुद्दा असा की मनातले प्रश्न स्वस्थ बसून देत नाहीत तेव्हा हा मिथकाचा आधार घेणं कोणत्याही संस्कृतीत होतच. हरतालिकेच व्रत अश्याच मिथकातून वर आलं असावं असं मला वाटत. या सगळ्या गोष्टी मला आवडतात. त्यात लोकपरंपरेचा अविर्भाव असतो. या गोष्टी लोकांनी रचलेला असतात. प्रदेशानुसार,  भाषेनुसार त्या बदलत जातात. या गोष्टी लोकांच्या मनाचा आरसा असतात. कमी अधिक प्रमाणात त्या लोकांच्या भावविश्वाचं दर्शन आपल्याला करून देतात म्हणून त्या आवडतात. या गोष्टी अंतिम सत्य आहेत असा क्लेम कोणाही करू शकत नाही.

या हरतालिकेच्या या व्रतात एक विलक्षण गोष्ट जाणवत राहते. श्रीमंत विष्णू नाकारून पार्वती गरीब, वनात राहणाऱ्या शंकरशी लग्न करण्याचा हट्ट करते. त्यासाठी ती घरातून पळून जाते. आणि तिचे बाबा सुद्धा तिचं प्रेम समजून घेऊन नर किलिंग न करता लग्नाचा स्विकार करतात. शिव आणि पार्वतीचं प्रेम हे जगातलं पहिलं आंतरजातीय लग्न होतं हेच अधोरेखित होत राहतं. या मिथकात आणखीही काही महत्वाच्या गोष्ट या गोष्टीत दिसून येता.

आधुनिक काळातही हरतालिकेच हे व्रत गरजेचं आहे. आजही हे व्रत प्रत्येक माणसाने अंगीकारावं. उपवर झाल्यावर पार्वती वनात जाते. ध्यान करते, म्हणजे नक्की काय करते?  प्रार्थना करणं, ध्यान करणं हे स्वतःचा स्वतःशी संवाद घडवून आणण्याचं साधन असतं.

डिजीटलायझेशनच्या युगात स्वतःशी हरवलेला संवाद पूर्ण करण्याची गरज आहे. या संवादातून नात्याची उकल होते. आपलं, आपल्या शरीराचं, आपल्या जोडीदाराचं, त्याच्या शरीराचं अशी कित्ती नाती एका नात्यात अंतर्भूत असतात. नात्यांची गुंतागुंत, त्यातले नानाविविध रंग समजून घ्यावे लागतात. जोडीदाराचा सन्मान करायला शिकावं लागतं. प्रेम करायलाही शिकावं लागतं. या सगळ्या अतिमहत्वाच्या गोष्टीचा कोणत्याही शैक्षणिक अभ्यासक्रमात साधा उल्लेखही नसतो. शाळा-कॉलेजातही या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. साधं मोकळेपणाने या गोष्टींविषयी बोललंही जात नाही. मग पॉर्नोग्राफी आमच्या लैंगिक शिक्षणाचं साधन होऊन बसतं. पण पॉर्नग्राफीतून मिळणारं लैंगिक शिक्षण हे चुकीचं असतं हे कधी उमजतंच नाही. जोडीदाराकडून अवाजावी अपेक्षा ठेवल्या जातात. मुळात जोडीदारासोबतचे नातेसंबंध सुदृढ करायला लैंगिक शिक्षण गरजेचं नसून लैंगिकता शिक्षण गरजेचं आहे हे सुद्धा कधी कळत नाही. लैंगिकता असं काही वेगळं असतं आणि त्यात सेक्सच्या पलिकडे अनेक गोष्टींचा समावेश असतो हे आपल्या गावीही नसतं. या सगळ्या गोष्टी स्वतःशी आणि जोडीदाराशी संवाद करून उलगडता येतात. जोडीदाराशी संवाद होण्याआधी स्वतःशी संवाद होणं गरजेचं आहे. आपल्याला कसा जोडीदार हवाय? मुळात हवा आहे का? हवा असेल, तर का?  नको असेल,  तर का?  हवा असेल तर त्याच्या कडून आपल्या कुठल्या अपेक्षा आहेत? त्या ठेवणं, न ठेवणं कितपत योग्य आहे? आपल्या आणि जोडीदाराच्या नात्यात कुठल्या रंगांना महत्व आहे? कुठल्या रंगांना कमी महत्व आहे? विश्वास, आपुलकी, स्पेस असे रंग किती गडद, किती फिके हवेत... हे इंद्रधनुष्य सुंदर करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आणि अश्या गोष्टींचा विचार आधुनिक काळ्यातल्या मुलांना आणि मुलींना करणं गरजेचं आहे.  

हेच ते आधुनिक काळातलं हरतालिकेचं व्रत! या व्रतात कर्मकांड नाहीत. उपास, तापास नाहीत. झाडं, पान, फुलं तोडणं नाही. पूजा अर्चा नाही. पण इफेक्ट १०० टक्के दिसणारंच! परंपरेकडून काही घ्यायचंच असेल तर तिचा मतितार्थ घ्यावा. स्वतःबद्दल आणि हव्या असणाऱ्या जोडीदाराबद्दल विचार होणं हा हरतालिकेच्या व्रताचा मतितार्थ. तो घेऊन,  उरलेल्या अविवेकी गोष्टी सोडून देऊन आपण अंतिम सत्याच्या आणखी जवळ जाऊ शकू. आपलं नात समृध्द करू शकू. पूजा अर्चा म्हणजे स्वतःसाठीचा वेळ. देवाशी संवाद म्हणजे स्वतःशी संवाद. देव मूर्त की अमूर्त याने काही फरक पडत नाही. आपला आपल्याशी संवाद होणं महत्वाचं.

याला व्रत म्हणायचं की नाही हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं. हे वर्षातून एकच दिवस करायचं का संपूर्ण वर्षात गरज पडेल तेव्हा तेव्हा करायचं हेही प्रत्येकाने आपलं आपलंच ठरवावं. पण या व्रतात चांगला आणि हवा तो जोडीदार मिळणार हे नक्की. कहाणी सुफळ संपूर्ण होणार हे नक्की!
     

Monday, 25 March 2019

हू एम आय ?


    आपल्याला आपलं पूर्ण नाव विचारलं तर आपण काय सांगतो? आपलं आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांनी ठेवलेलं नाव त्यापुढे आपल्या वडिलांचं नाव आणि मग अर्थातच आपलं आडनाव. या नाव सांगण्याच्या पद्धतीत कितीतरी प्रकारची भेदभावाची साधनं लपलेली आहेत. आपलं नाव हि आपली ओळख असते. पण आपली ओळख आपण निवडलेली नसतेच मुळी! जात, धर्म, वर्ण, लिंग या facticities जन्मभर आपला पीच्छा सोडत नाहीत. आपल्या नावातून आणि विशेषतः आपल्या आडनावातून आपली जात सतत डोकं वर काढते.आपल्या नावातून आपला धर्म हात हलवत सतत 'Hii' करत राहतो.
नाव सांगण्याच्या पारंपारिक पद्धतीत आपली स्वतःबद्दलची जाणीव आपल्या पालकांशी जोडलेली असते. किशोरवयातल्या मुला-मुलींच्या स्वतःच्या वेगळ्या जाणीवा असतात. त्या जाणिवांना साधा या नाव लिहिण्याच्या पद्धतीत वाव मिळत नाही तर इतर ठिकाणी त्याचा विचार तो काय आणि किती केला जाणार?
म्हणूनच आमच्या आरोग्यभान च्या शिबिरात आम्ही आमची ओळख बदलतो. मुलांनी त्यांची ओळख त्यांचं नाव आणि त्यांच्या नावासमोर निसर्गातल्या एखाद्या वस्तूचं नाव सांगून करून द्यायची असते. आणि निसर्गातली तीच वस्तू का निवडली हे सुद्धा सांगायचं असतं. ओळख करून देण्याच्या या पद्धतीतून फक्त माणसाची जात आणि धर्म बाजूला पडतो असं नाही तर त्या मुलाबद्दल त्याच्या नावापेक्षा अजून जास्त माहिती कळते. त्याचा स्वभाव, त्याची विचार करायची पद्धत कळते. शिवाय निसर्ग फक्त जमिनीवर असत नाही. तो जमिनीच्या खाली सुद्धा असतो. तो पाण्यावर असतो, पाण्याआत असतो. हवेत तरंगत असतो. आकाशाच्या पलीकडेही असतो. तुमच्या माझ्या आत सुद्धा निसर्ग असतोच की! या सगळ्या निसर्गाची जाणीव आपल्याला कितपत असते? माझं म्हणणं शून्य! आपला अविभाज्य भाग असणाऱ्या निसर्गाची जाणीव आपल्याला शून्य असते. आपली ओळख अश्या प्रकारे नाव सांगून करून दिली की मुलांना कोणतीही अवघड फिलॉसॉफी न ऐकता त्यांच्या आणि निसर्गाच्या या नात्याची जाणीव होते. संवादकांनी सुद्धा आपली ओळख अशीच करून द्यायची. मग मी कधीकधी 'रेणुका नदी' असते. कारण तेव्हा मला नदीसारखं प्रभावी रहावस वाटतं असतं. कधी कधी मी 'रेणुका पालापाचोळा' असते, कारण पालापाचोळा कुजवून जसं नैसर्गिक खत तयार केलं जातं तसं मी कुजून समाजासाठी चांगलं खत तयार व्हावं असं मला वाटत असतं. कधीकधी मी 'रेणुका चाफा' असते कारण मला चाफ्यासारखं नम्रतेच्या सुगंधाने माखून जायचं असतं. हो. नम्रतेला एक सुगंध असतो असं मला वाटतं. तो सुगंध सॉक्रेटिसलाही येत असणार. तो सुगंध माझ्या आसपासच्या खूप माणसांनासुद्धा येत राहतो. तर दिवसागणिक माझी ओळख बदलली तरी ती शेवटी माझीच असते. उलटं तिचं असं दिवसागणिक बदलणं तिला आणि मला एका जागी साचू देत नाही.
मुलं जी नावं सांगतात त्यात एक प्रकारचा पॅटर्न असतो. बरेचदा निसर्गातली अमकी अमकी गोष्ट सकारात्मक आणि तमकी तमकी गोष्ट नकारात्मक असा आपला समज लहानपणापासून करून दिलेला असतो. त्यामुळे पाल, घुबड किंवा कॅक्ट्स अश्या गोष्टींची नावं कोणी आपल्या नावापुढे लावत नाही. कारण त्या गोष्टींविषयी अंधश्रद्धा आणि स्टिगमा असतो. घुबड घराजवळ येणं अशुभ किंवा पाल चुकचुकणं वाईट असं मानलं जातं. असे समजात वावरताना आणि निसर्ग म्हणजे फक्त सुंदरच असणार असं मुलांच्या मनावर कोरलेलं असताना पाल किंवा घुबडासारखी नाव मुलांना न सुचणं अगदीच सहाजिक असतं. मग कोणीतरी संवादक मुद्दाम असं नाव लावतो. 'रेणुका कुत्रा' असं म्हणली की मुलं हमखास हसतात. पण पुढच्याच क्षणी ही पण निसर्गातली गोष्ट आहे असं त्यांचं त्यांनाचं कळत आणि त्याविषयी असलेले समज अपसमज कोणीही काहीही उपदेश केलेला नसतानाही गळून पडतात. सगळा निसर्ग त्यांचा होतो.
या नावं घेण्यात एक पॅटर्न असला तरी त्यात एकसुरीपणा नसतो. मुलांचं डोकं भन्नाट चालत असतं. ती काही काही विचार करत असतात. वेगवेगळी नावं घेत असतात. राजस्थानमधल्या एका मुलीने आपलं नाव सांगतांना आपल्या नावापुढे 'जरफिशान' असा उर्दू शब्द वापरला होता असं Mohan मोहन सांगतात. जरफिशान म्हणजे चांदण्यातला पाऊस. तिने हे नुसतं म्हणल्या बरोबर ही मुलगी कवी मनाची असणार असा तथ्याच्या जवळ जाणारा अंदाज लगेच बांधता येतो. एच. आय. व्ही. असलेल्या मुलांसाठीही असं शिबीर घेतलं जातं. त्यात एकदा एका मुलीने आपल्या नावापुढे 'फुलपाखरू' असं नाव लावलं होतं. संवादकांना वाटलं की ही काहीतरी छान सांगेल. म्हणजे फुलपाखरू खूप रंगांचं असतं, मोकळं उडतं असं काहीतरी. याउलट ती मुलगी म्हणाली की जसं फुलपाखराचं आयुष्य अवघ्या काही दिवसांचं असतं तसंच एच. आय. व्ही. असल्याने आमचं आयुष्य पण लहान आहे, म्हणून 'फुलपाखरू'! हे हेलावून टाकणारं होतं. यातून मुलांना कश्याबद्दल काय वाटतं हे सुद्धा कळतं. काही वेळा मुलं नुसतंच 'मला आवडतं' असं म्हणतात. अशी मुलं बहुतेक वेळा लाजऱ्या स्वभावाची असतात. त्यांना थोडंसं प्रोत्साहन दिलं की ही लाजरी मुलं सुद्धा एकदम खुलतात.
काही शिबिरात मुलं थोडी वयाने मोठी असतात. अश्यावेळी किंवा अंगणवाडी सेविकांच्या शिबिरात आपल्या नावासमोर फक्त आपल्या आईचं नाव सांगायचं आणि आपल्या आईबद्दल थोडंसं काहीतरी बोलायचं असं आम्ही ठरवतो. आपल्या नावापुढे बाबांचं नाव आपण हमखास लावत असतो. पण ज्या आईकडून आपण जन्म घेतला त्या आईचं नाव लावणं ही 
वेगळी गोष्ट असते. यात एक छुपी टेक्निक आहे असं मला वाटतं. काही वेळा काही व्यक्तींची आई लहानपणीच मरण पावलेली असते. तेव्हा ही व्यक्ती माझे बाबाच माझी आई आहे असं सांगून बाबांचंच नाव घेऊ शकते.
      संवादकांच्या प्रशिक्षणासाठी घेतलेल्या एका शिबिरात तर आम्ही आमच्या नावापुढे आम्हाला आवडणाऱ्या पुस्तकाचं नाव सांगितलं होतं आणि त्या पुस्तकाविषयी थोडंसं बोललो होतो. माझ्या नावापुढे मला अनेक पुस्तकं लावावीशी वाटतात. कधी 'रेणुका वनवास' असं म्हणावं. कधी 'रेणुका Memories of a Dutiful Daughter' असं म्हणावं वाटतं. कधी 'पाडस', कधी 'हिरवे रावे' आणि असं बरच काही!
पण कोणत्या शिबिरात ओळख करून देण्याची कोणती पद्धत वापरायची याची फार काळजी घ्यावी लागते. अनाथ मुलांच्या संस्थेत तुमच्या आईच नाव सांगायची पद्धत वापरून चालत नाही. त्याने मुलं प्रचंड हर्ट होऊ शकतात. रादर ते आपल्या आईचं नाव सांगूच शकत नाहीत.
या नावाचे बॅजेस करायला मुलांना सांगितलं जातं. त्यासाठी त्यांनी रंग वापराचे असतात. आसपास दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी आपण वापरु शकतो. फक्त निसर्गाची नासधूस करून किंवा कोणतीही गोष्ट पैसे देऊन विकत आणायची नाही अश्या दोन अटी असतात. टाकाऊ वस्तूतून बॅज बनवायचा आणि तो खांद्यावर किंवा छातीवर लावायचा. मुलं फार भारी डोकं लढवतात. 'ढग' असलेला मुलगा घरातला कापूस वापरतो. 'सूर्य' असलेली मुलगी बॅजवर सूर्य काढते, त्याला रंगवते. संपूर्ण शिबीरभर मुलं या नव्या नावाने ओळखली जातात. त्यांना ते आवडतं कारण ही ओळख त्यांनी स्वतः विचार करून निवडलेली असते.
- रेणुका



Thursday, 16 November 2017

हिडन एव्हिडन्स!

धान्य निवडण्यात सुद्धा काय अनामिक मजाय...!!! मला आठवतं, शाळेत असताना सुट्टीत आजीकडे गावी गेलं कि हा कार्यक्रम ठरलेला असायचा.मग एक दिवस सकाळी ऊन्हं वर आली कि घराच्या गच्चीवर आज्जीची जुनी साडी अंथरायची. चार टोकाला चार दगड ठेवायचे. तसले मोठाले दगड शोधण्यासाठी मग निम्मा परीसर पालथा घालायचा. आणि नाहीच सापडले तर मध्यम आकाराचे तिन-चार दगड प्रत्येक कोप-यात ठेवायचे. एकजुटीनं काम करणं म्हणजे काय हे आज्जीला त्या दगडांनी शिकवलं असावं!  दोन मावश्या आणि मी अशी आमची टिम. आज्जी टिम लिडर. मग जे काही धान्य असेल त्याची भरलेली पोती गच्चीवर न्यायची अन् अंथरलेल्या साडीवर बिन्धास ओतुन द्यायची. मग हाताने सावरत एक एक दाणा वेगळा करायचा अन् त्या साडीवर प्रत्येकाला स्वतंत्र जागा द्यायची. नो ओव्हरलॅपींग!!
     क्वचितच कधी धान्य खायला माकडं यायची. नाहीतर कबुतर, चिमण्या, साळुंकी असे रोजचे पक्षी आहेतच. इतरवेळी राखण करायला मला फार भारी वाटायचं. माकडं आली कि मात्र धांदल उडायची.
    दुपारची जेवण आटपली झोप झाली कि सगळं धान्य खाली आणायचं. मग मी दोन मावश्या आणि आज्जी मोठी ताटं घेऊन धान्य निवडायला बसायचो. धान्यातली घाण, किडे वेचुन वेचुन पाण्यात टाकायच्या. खिडकीतुन येणारं हलकं ऊन आणि जोरात वाहणारा वारा यांचं कोंबीनेशन म्हणजे काहीतरीच भन्नाट असायचं. या निवडा-निवडीत कित्येक गप्पा व्हायच्या, गाणी व्हायची, जोक्स व्हायचे. मधेच आजोबा फक्कड चहा बनवायचे मग त्याच्या जोडीला काहितरी तळण करुन कामाचा कंटाळा घालवायचा. चहा प्यावत नसेल तर कधीतरी आईसक्रिम पार्टी व्हायची.... तेव्हा कंटाळवाणं, नको वाटणारं ते काम आज रात्री एकच्या ठोक्याला माझ्या मनात इतक्या आठवणी क्रियेट करेल अस कधीच वाटलं नव्हतं!
    मग आज्जी सगळं धान्य परत परत पाखडायची अन् मग पुन्हा सारं धान्य कोठीत भरुन ठेवायचं आणि अंधार पडायच्या आत घर झाडुन घ्यायचं. झालेल्या अंधाराला आणि रात्रीला आम्ही काम केल्याचा कोणताच पुरावा आज्जी मागे ठेवायची नाही. बसुन बसुन दुखणारी पाठ हाच काय तो हिडन एव्हिडन्स.... ©Renuka

एका नास्तिकाचे पत्र

प्रिय आस्तिक माणसा, (असहिष्णूवाला)
       गेल्या खूप दिवसांपासून मी तत्त्वज्ञान शिकतेय आणि माझ्या नास्तिकतेचा, तू काढून घेऊ पाहणारा, पाया अधिकाधिक भक्कम होऊन मला परत मिळतोय.
       तब्बल  १६ शतक  धर्माच्या सांगण्यावरून डार्क एजमधे गाढ झोपलेल्या जगाला देकार्त, गॅलिलिओ गदागदा हलवतात. रेनेसान्स नावाचं बादलीभर पाणी जगाच्या तोंडावर ओततात. तेव्हा कुठे जग थोडफार जाग आल्यासारखं दाखवतं. तिथे पर्शिया मधे कुठेतरी कोपरनिकस नावाचा शास्रज्ञ जन्माला येतो आणि सगळ्या धर्मांच्या, सगळ्या लोकांच्या, सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन 'ब्रह्मांडाच्या मध्यभागी पृथ्वी नाही तर सूर्य आहे' हे सत्य सांगतो. जगाला 'इन्लाइटन्ड' करतो! आणि जग या 'बंडखोरी' क्रांतिकारकांना विरोध करत...?!
       जगाचा हा सगळा प्रवास मला खूप आपलासा वाटतो. माणसाच्या अस्तित्वाच्या पहिल्या पाऊलखुणा सापडतात त्या काळात जगाला विश्वउत्पत्तीशास्त्र (Cosmology) महत्वाचं वाटतं होतं. मग सॉक्रेटिस आला, प्लेटो, अॅरिस्टॉटल आले. नीती-अनीती च्या संकल्पना रूढ झाल्या. आणि धर्म आला. तेव्हा जगाने प्रश्न विचारणं बंद केलं आणि प्रबोधन काळातील  क्रांतिकारी विचार प्रकाश दाखवत नाहीत तोवर, म्हणजे जवळपास १६०० वर्ष, जग अंधा-या युगात बुडून राहीलं. जन्माला आले, स्वतःच्या अस्तित्वाच्या खूणा समजून घेऊ लागले तेव्हा मला सुद्धा कॉस्मॉलॉजीत इन्टरेस्ट होता. इतर लहान मूलं प्रश्न विचारतात तसे पृथ्वीबद्दल, चंद्र, सूर्य, तारे, आकाश, हवा, पाणी, अग्नी अगदी सगळ्यांबद्दल मी सुद्धा कुतूहल दाखवलं. पण हळूहळू घरच्यांनी, शेजार-पाजा-यांनी , अगदी शाळेनेसुद्धा 'देवासारखी गप्प बैस' फॉर्म्युला वापरून मला गप्प केलं आणि जवळपास १६ वर्षांनंतर जे रिव्होल्यूशन कोपरनिकसने खगोलशास्त्रात केलं तेच रिव्होल्यूशन मी माझ्या आयुष्यात केलं. कोपरनिकस ने ब्रम्हांडाचा केंद्रबिंदू बदलला. मी माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू बदलला; देव, धर्म यांच्यावरून माझ्यातल्या मला माहित नसलेल्या मी शोधण्यात हलवला. मी स्वतःच अस्तित्व शोधण्यासाठी देवाचं आणि धर्माचं अस्तित्व नाकारलं! अस्तिक माणसा, तूला हे सारं स्व-प्रेम किंवा पश्चिमेकडून आलेला selfishness वाटतो. पण मला फक्त स्वतःला एक्सप्लोर करताना येणारा धर्माचा आणि देवाचा अडथळा दूर करायचा होता.
     मला माहितीये, तुझ्यासाठी देव, धर्म  हे स्वतः ला एक्सप्लोर करण्यातले अडथळे असत नाहीत. उलट ते तुझे तुझ्या ध्येयापर्यंत नेणारे मार्ग असतात. कारण तू त्यांच्यावर श्रद्धा ठेवतोस, विश्वास ठेवतोस. तुझी श्रद्धा अंधश्रद्धेत कधी बदलते ते तूझं तूलाही कळत नाही ते जाऊ दे, पण मुळात तूझ्याकडे तो श्रद्धेचा भाव आहे. सुदैवाने म्हण कि दुर्दैवाने हा भाव माझ्यात नाहीये. हा भाव मला खूप खूप आवडतो. 'विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यायचाय, जीवन-मरणाच्या रहाटगाड्यातून मूक्त व्हायचं नाहीये' असं म्हणणारे तुकाराम मला प्रचंड भावतात. मला तुकारामांचा, त्यांच्या आणि तुझ्या श्रद्धेचा मनापासून आदर वाटतो. खूप खूप वाटतो. पण मला तुकारामांविषयी किंवा त्यांच्या विठ्ठलाविषयी श्रद्धा नाही वाटत. मग कशाला उगाच जुल्माचा रामराम?! मला नाही वाटत कि माझा देव ज्याला आपण विठ्ठल/गणपती/विष्णू/सरस्वती/दुर्गा/काली असं म्हणतो त्या कुठल्याही दगडात किंवा मूर्तीत असेल. मला माझा देव चौकट-बद्ध नको वाटतो. स्पिनोझाचं 'Every determination is negation' हे वाक्य मला माझ्या देवाविषयी सुद्धा खरं वाटू लागतं. मी माझा देव काय आहे किंवा काय नाहीये किंवा काय असायला पाहिजे किंवा काय नसायला पाहिजे किंवा काय असू शकतो किंवा काय नसू शकतो असं काहीच नाही सांगू शकत. मला माझा देव अमूर्त वाटतो! ज्याच्यासमोर झुकण्याची/ ज्याला खुश करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. असं केल्याने देव मला हवं ते, मी मागेल ते सगळं सगळं काही मला देईल आणि मला सुखी ठेवेल असही मला नाही वाटत. कारण आधी हिरेक्लिटस आणि नंतर बुद्ध मला हेच सांगत राहतात कि जगण्यातलं दुःख आणि आयुष्यातलं इमपरफेक्शन अटळ आहे. मग परफेक्शनच्या मागे जीव खाऊन पळण्यापेक्षा आणि स्वतः चा भ्रमनिरास करून घेण्यापेक्षा मी आहे तसं सगळं स्विकारणं जास्त रास्त आहे ही जाणीव मला तत्त्वज्ञान करून देतं.
        बघीतलस! हे असं सेल्फ-एक्सप्लोर करायला तत्त्वज्ञान मला मदत करतं. धर्माच्या, परंपरेच्या नैतिक संकल्पना झुगारून दिल्यावर माझ्या नैतिक संकल्पना उभारायला तत्त्वज्ञान मला आधार करत. त्या चुक की बरोबर हे तपासून घ्यायला मला तत्त्वज्ञान शिकवतं.
अस्तिक माणसा, तत्त्वज्ञान मला देव नाकारायला शिकवत नाही. बस माझी नास्तिता चूकीची नाही हे शिकवतं. सोबतच जे अस्तिक आहेत, जे देव मानतात त्यांच्या मताचा आदर करायला शिकवतं. तत्त्वज्ञान मला न्याय दर्शन किंवा वेद देवाच्या अस्तित्वाचे पुरावे देतं इतकच सांगतं. पण 'देवाच्या असण्याचे एखादी scientific गोष्ट प्रुव्ह करताना द्यावे लागतात तसे प्रुफ्स का द्यावे लागतात ... किती खोटेपणा आहे इथे, किती चुकिचय हे!' असा विचार करत असताना तत्त्वज्ञान मला 'ते' सुद्धा बरोबर असू शकतात ही द्रुष्टी देतं. तत्त्वज्ञान मला सहिष्णुता देतं.       तत्त्वज्ञान माझ्या सौदर्याचा कल्पना बदलतं.तत्त्वज्ञान मला 'know thyself' शिकवतं. तत्त्वज्ञान मला मी स्त्री नसून मुक्त माणूस आहे हे सांगतं. कुठलीही व्यक्ती स्री, पुरुष किंवा इतर कुठल्याही जेंडर पलिकडे एक निखळ माणूस असू शकते हे तत्त्वज्ञान माझ्या मनावर बिंबवतं. तत्त्वज्ञानात मला 'वसुधैव कुटुंबकम्।' चा खरा अर्थ उलगडतो. तत्त्वज्ञान मला माणूसपण देतं आणि माणूस बनवतं.
        प्रिय अस्तिक माणसा, इतक्या सुंदर जगण्यासोबत मानसिक समाधान आणि स्टेबिलिटी तत्त्वज्ञान मला देत असताना, मला सांग, तू हे सगळं नाकारून, दिसणा-या सूर्याकडे पाठ फिरवून मी पुन्हा अंधा-या गुहेत जाऊन बसावं असं तू का बरं म्हणतोस? मी 'कुठुनतरी' 'काहितरी' शिकून येते आणि वेड्यासारखं वागते असं तुला वाटतं. पण मला माहितीये, जे मनसोक्त नाचत असतात त्यांना तेच लोक वेडं म्हणतात ज्यांना ते ज्यावर नाचतायत ते संगीत ऐकू येत नसतं. सॉक्रेटिस असो वा गॅलिलिओ प्रत्येक नाचणा-या माणसाला जग वेडंच म्हणतं. तळ्यातल्या बदकांच्या पिल्यांपेक्षा 'वेगळं' असणारं पिल्लू नेहमी कुरुप आणि वेडच असतं.
        शेवटी इतकच सांगेन, तु काय किंवा मी काय आपण दोघेही जैनांच्या सहा आंधळ्यांच्या गोष्टितले हत्ती एक्सप्लोर करणारे दोन आंधळे आहोत. तू पाय चपापतोयस आणि मी सोंड! आपण दोघांनीही संपूर्ण हत्ती जाणला नाहीये. तो कळत नाही तो पर्यंत एकमेकांचा आदर करत राहूया?
                                                      तुझीच,
                                            एक नास्तिक मैत्रिण.
©Renuka

Saturday, 11 November 2017

ग्रहण

प्रिय,
     मी पृथ्वीसारखी होते. तू खोदत होतस माझे भूभाग खोल-खोल. उलगडत होतास माझ्या अंतरंगातली रंगीबेरंगी खनिजं.. तू माझ्या भूगर्भातील ज्वालामुखी सुद्धा पाहीलास. मला वाटायचं हा ज्वालामुखी शांत करण्याचं काम फक्त तूच करु शकतोस. नंतर उमगलं मी फक्त तूलाच ते करु देत होते. विनाशकारी आणि जिवनदायनी ही दोन्ही रुपं मी तुझ्यासमोर निर्लज्जपणे उघडी केली. इतकच काय! माझी हतबलता, माझ्यातला वांझोटा भाग, माझ्या अंतरंगात होणाऱ्या अस्वस्थतेने माझ्या शरीरावर उमटणारे भूकंप... तू सारं सोसलस. माझं तारांगण उघड्या डोळ्यांनी मनसोक्त पाहिलंस. समुद्रासारख्या माझ्या खारट अश्रुंवर तू कविता केल्यास. मी आजारी झाल्यावर झाडं लावावीत तशी तू माझी वेणी-फणी केलीस. तू माझं सौंदर्य इन्जोए केलसं, तशीच माझी विराटता सहन केलीस. पण तू माणूस होतास हे मी नजरअंदाज केलं; तिथेच माझं चुकलं.
    माझ्यावरच्या प्रेमाच्या बदल्यात तू माझ्यावर उमलणा-या कित्येक कळ्या निर्दयीपणे खुंटल्यास. माझ्या पोटातली खनिजं तू तूझ्या हितासाठी वापरलीस. माझ्या चेह-यावरून येणारा बुद्धिमत्तेचा सुर्यापेक्षाही प्रखर प्रकाश तू तूझ्या डोक्यातली खानावळ शिजवण्यासाठी वापरलास. माझ्या हतबलतेत, माझ्या लाचारीत तू मला स्वतःचा गुलाम समजलास. माझ्या शरीरावर उमटणारे भूकंप तू बुझवलेस माझं सात्वंन करतोयस असं दाखवण्यासाठी. 
     ....तरीही... मी तूझ्यावर प्रेम केलं. कारण, मी तुला त्रास दिला तरी इसवीसन पुर्वी पासून तु माझ्याजवळच होतास. माझा सोडून दुस-याचा विचार केला नाहीस. पण आज तू मंगळावर जाऊन आलास. तूला दुस-या ग्यालेक्सीत इन्टरेस्ट वाटू लागला. तूझ्या वी-यांपासून तयार झालेली असंख्य लेकरं असणारी पोटुशी 'मी'  कुरूप झाले होते. तूला  नवं सौंदर्य हवं होतं...
     तू मंगळावर पाणी शोधू लागलास. चंद्रावर हवा शोधू लागलास. माझ्या आयुष्याला ग्रहण लागलं...
                                                                 तूझीच.         
                         
©Renuka

Wednesday, 3 May 2017

’घर’





            वास्तुत एक अनाकलनीय जादु असते. आज घर नावाच्या वास्तुचं मला फार अप्रुप वाटु लागलयं... २० व्या शतकाच्या शेवटाला जन्मल्याने 'ज्या घरात जन्मले' अस म्हणता येणार नाही खरतर पण तरी, मला वाटतं... तुम्ही काय, मी काय! आपण खरे घरातच 'जन्मत' असतो. एकदा नाही... कित्येकदा.... अगदी रोजच म्हणुयात ना...!
मी जन्मले.... आईच्या कुशीतुन बाहेर येऊन इथल्या फरशीवर पालथं पडले, रांगले तेव्हा.... इथल्या भिंतीचा आधार घेऊन चालू लागले तेव्हा... गॅलरीतल्या झोपाळ्यावर बसून लाड पुरवून घेतले तेव्हा... इथल्या कोप-यात भातुकलीचा लटीका संसार मांडला तेव्हा... जिव ओतून अभ्यास केला तेव्हा... बक्षीस मिळालं कि नाचले तेव्हा... प्रत्येक क्षणाला घर किती आपलं वाटत राहीलं... इथली माणसं वाटली कधी आपली, कधी परकी! पण घर नेहमीच माझं म्हणून काहीतरी राहीलं... अगदी आजसुद्धा शरीर आणि मन थकलं कि इथे विसावू पाहतं... अगदी आजही इथल्या भितींचा खुप खुप आधार वाट्टो. अगदी आजही इथल्या कोप-यात जगू वाट्टं... कोपऱ्यात-कोप-यापुरतचं....
          या चार भिंती, गार-गार फरश्या, वारा भरुन राहिलेली गॅलरी, प्रकाशाची वाट देणारी खिडकी... झालच तर खिडकीतून दिसणारी आंब्याची, जांभळाची नि कसली कसली झाडं, मागला झुळझुळ ओढा, रात्री पडणारा किर्र, गुढ अंधार... काहीतरी सांगु पहातो तो! ...खिडकीआतलं नि खिडकीबाहेरच.... सा-यावर माझा कॉपीराईट असल्यागत वाट्टं कधीतरी... पण एक मात्र खरं... या खिडकीआतल्या जगाला खिडकीबाहेरच्या जगाशिवाय अस्तित्व नाही आणि खिडकीबाहेरच्या जगाला खिडकीआतल्या जगाशिवाय अर्थ नाही. कसं इंटरकनेक्टेड! माझ्या भावविश्वाचं गाव उभारतय या दोन जगांच्या संगमावर... कित्ती काय काय दिलय या इंटरकनेक्शननं.. कधीच न संपणारी शांतता दिलीये. गच्ची नावाच भावणारं एकटेपण दिलयं. घड्याळाची सुरेल टिकटिक दिलीये. गळणा-या नळाचा आवाज दिलाय. खिडकीत उभारुन पावसाचा शिडकाव अनुभवण दिलय. खिडकीतून डोकावणारा चंद्र दिलाय. पानझडीत वसंत दिलायआणि जगताना नितांत आवश्यक अस समजुतदार दुःख दिलयं...
            घराच्या चार भितींत कोंडुन घेताना मी खरतर आणखी आणखी मुक्त होत जाते, मोकळ्या आभाळाला साद देत राहते. आज प्रकर्षाने जाणवलय... परक्या आभाळाखाली गेल्यावर किंवा रोजच आभाळ एकाएकी परकं भासु लागल्यावर घराची दारं जणू वर्षानुवर्ष आपली वाट पाहतायत अस वाटु लागतं. घर मला आपलेपणाबद्दल आश्वासन देत असतं... मी मात्र 'आपलं असं काय!' म्हणत कमालीची अस्वस्थ होत असते... ©Renuka



Wednesday, 12 April 2017

अंधार




Z bridge चा पुल नेहमी सारखाच गाड्यांनी भरला होता. तशी गर्दीचीच वेळ म्हणा ती. तिचं ओफिस सुटण्याची वेळ आणि मावळतीचा सुर्य यांची सांगड नेहमीचीच! आज घरी लवकर पोहोचायचं बंधन नाही म्हणुन ती निम्मं अंतर चालुन कापत होती... 'तेवढीच झोप लागेल दमल्यामुळे' तिचं logic...! पायाकडे बघितलं कि तिला तिची तुटकी चप्पल दिसे. तशी ती फार गरीब नव्हती. पण १० चप्पलच्या जोड्या असाव्यात इतकी हौशीही नव्हती.
मंद वाहणारा वारा अनुभवता यावा म्हणुन तिनं चेह-यावरचा स्कार्फ सोडला नि हातातली bag सावरत पुन्हा चालु लागली. त्याच्या सोबतच्या कित्तीतरी आठवणी कडेवर घेऊन, त्यांना छातीशी बिलगुन. ते दोघं सोबत असायचे तेव्हा ती नेहमी बॅग जड असल्याची तक्रार करायची. तो तिचे संकेत ओळखायचा अन् म्हणायचा "दे इकडे ती बॅग तुझे नाजुक खांदे दुखतील" ति हलकीच लाजायची. ति गुलाबी "मुलींची" बॅग असुन सुद्धा तो ती खांद्यावर घ्यायचा. आणि तिचं सगळच ओझं हलकं झाल्यासारखं तिला वाटायचं...
आता मात्र त्या बॅग पेक्षा तिला त्याच्या आठवणींच ओझच जास्त वाटु लागलं होतं. "इलाज नाही! तो थोडीच येणारे आता माझं ओझं उचलायला?!" ति स्वत:शीच म्हणली. मोठा श्वास टाकुन तिने वर पाहीलं अन् ती तिथेच स्तब्ध झाली. समोरुन तोच येत होता. कानात नेहमीच्या स्टाईलने अडकवलेल्या मोबाईलच्या कॅार्ड्स होत्या. त्यानं तिच्या आवडीचा शर्ट घातला होता. तिला वाटलं तिच्याशी बोलायला येतोय कि काय.... पण तिच्याकडे न बघता तो तिच्या बाजुने अलगद निघुन गेला. ती जागेवरच थांबली. मागे वळुन त्याच्या पाठमो-या आकृतीकडे पाहीलं नि मग तिला वास्तवाची नव्याने जाणीव झाली. तेच दु:ख, तोच त्रास पुन्हा नव्याने झाला.
डोळ्यातले अश्रु तिला काही नवीन नव्हते. ते कोणाला दिसु नयेत म्हणुन तिनं पुन्हा स्कार्फ बांधला नि चालु लागली. एव्हाना सुर्यही मावळला होता.
 "पडणारा अंधार सुद्धा आता माझाच आहे" ति म्हणाली.
©Renuka

आधुनिक काळ आणि हरतालिकेचं व्रत.

रेणुका कल्पना हिमालयाची कन्या पार्वती ही उपवर झाल्यावर तिच्या पित्याने तिच्यासाठी पती म्हणून विष्णूची निवड केली. विष्णूशी लग्न करा...