आपल्याला आपलं पूर्ण नाव विचारलं तर आपण काय सांगतो? आपलं आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांनी ठेवलेलं नाव त्यापुढे आपल्या वडिलांचं नाव आणि मग अर्थातच आपलं आडनाव. या नाव सांगण्याच्या पद्धतीत कितीतरी प्रकारची भेदभावाची साधनं लपलेली आहेत. आपलं नाव हि आपली ओळख असते. पण आपली ओळख आपण निवडलेली नसतेच मुळी! जात, धर्म, वर्ण, लिंग या facticities जन्मभर आपला पीच्छा सोडत नाहीत. आपल्या नावातून आणि विशेषतः आपल्या आडनावातून आपली जात सतत डोकं वर काढते.आपल्या नावातून आपला धर्म हात हलवत सतत 'Hii' करत राहतो.
नाव सांगण्याच्या पारंपारिक पद्धतीत आपली स्वतःबद्दलची जाणीव आपल्या पालकांशी जोडलेली असते. किशोरवयातल्या मुला-मुलींच्या स्वतःच्या वेगळ्या जाणीवा असतात. त्या जाणिवांना साधा या नाव लिहिण्याच्या पद्धतीत वाव मिळत नाही तर इतर ठिकाणी त्याचा विचार तो काय आणि किती केला जाणार?
म्हणूनच आमच्या आरोग्यभान च्या शिबिरात आम्ही आमची ओळख बदलतो. मुलांनी त्यांची ओळख त्यांचं नाव आणि त्यांच्या नावासमोर निसर्गातल्या एखाद्या वस्तूचं नाव सांगून करून द्यायची असते. आणि निसर्गातली तीच वस्तू का निवडली हे सुद्धा सांगायचं असतं. ओळख करून देण्याच्या या पद्धतीतून फक्त माणसाची जात आणि धर्म बाजूला पडतो असं नाही तर त्या मुलाबद्दल त्याच्या नावापेक्षा अजून जास्त माहिती कळते. त्याचा स्वभाव, त्याची विचार करायची पद्धत कळते. शिवाय निसर्ग फक्त जमिनीवर असत नाही. तो जमिनीच्या खाली सुद्धा असतो. तो पाण्यावर असतो, पाण्याआत असतो. हवेत तरंगत असतो. आकाशाच्या पलीकडेही असतो. तुमच्या माझ्या आत सुद्धा निसर्ग असतोच की! या सगळ्या निसर्गाची जाणीव आपल्याला कितपत असते? माझं म्हणणं शून्य! आपला अविभाज्य भाग असणाऱ्या निसर्गाची जाणीव आपल्याला शून्य असते. आपली ओळख अश्या प्रकारे नाव सांगून करून दिली की मुलांना कोणतीही अवघड फिलॉसॉफी न ऐकता त्यांच्या आणि निसर्गाच्या या नात्याची जाणीव होते. संवादकांनी सुद्धा आपली ओळख अशीच करून द्यायची. मग मी कधीकधी 'रेणुका नदी' असते. कारण तेव्हा मला नदीसारखं प्रभावी रहावस वाटतं असतं. कधी कधी मी 'रेणुका पालापाचोळा' असते, कारण पालापाचोळा कुजवून जसं नैसर्गिक खत तयार केलं जातं तसं मी कुजून समाजासाठी चांगलं खत तयार व्हावं असं मला वाटत असतं. कधीकधी मी 'रेणुका चाफा' असते कारण मला चाफ्यासारखं नम्रतेच्या सुगंधाने माखून जायचं असतं. हो. नम्रतेला एक सुगंध असतो असं मला वाटतं. तो सुगंध सॉक्रेटिसलाही येत असणार. तो सुगंध माझ्या आसपासच्या खूप माणसांनासुद्धा येत राहतो. तर दिवसागणिक माझी ओळख बदलली तरी ती शेवटी माझीच असते. उलटं तिचं असं दिवसागणिक बदलणं तिला आणि मला एका जागी साचू देत नाही.
मुलं जी नावं सांगतात त्यात एक प्रकारचा पॅटर्न असतो. बरेचदा निसर्गातली अमकी अमकी गोष्ट सकारात्मक आणि तमकी तमकी गोष्ट नकारात्मक असा आपला समज लहानपणापासून करून दिलेला असतो. त्यामुळे पाल, घुबड किंवा कॅक्ट्स अश्या गोष्टींची नावं कोणी आपल्या नावापुढे लावत नाही. कारण त्या गोष्टींविषयी अंधश्रद्धा आणि स्टिगमा असतो. घुबड घराजवळ येणं अशुभ किंवा पाल चुकचुकणं वाईट असं मानलं जातं. असे समजात वावरताना आणि निसर्ग म्हणजे फक्त सुंदरच असणार असं मुलांच्या मनावर कोरलेलं असताना पाल किंवा घुबडासारखी नाव मुलांना न सुचणं अगदीच सहाजिक असतं. मग कोणीतरी संवादक मुद्दाम असं नाव लावतो. 'रेणुका कुत्रा' असं म्हणली की मुलं हमखास हसतात. पण पुढच्याच क्षणी ही पण निसर्गातली गोष्ट आहे असं त्यांचं त्यांनाचं कळत आणि त्याविषयी असलेले समज अपसमज कोणीही काहीही उपदेश केलेला नसतानाही गळून पडतात. सगळा निसर्ग त्यांचा होतो.
या नावं घेण्यात एक पॅटर्न असला तरी त्यात एकसुरीपणा नसतो. मुलांचं डोकं भन्नाट चालत असतं. ती काही काही विचार करत असतात. वेगवेगळी नावं घेत असतात. राजस्थानमधल्या एका मुलीने आपलं नाव सांगतांना आपल्या नावापुढे 'जरफिशान' असा उर्दू शब्द वापरला होता असं Mohan मोहन सांगतात. जरफिशान म्हणजे चांदण्यातला पाऊस. तिने हे नुसतं म्हणल्या बरोबर ही मुलगी कवी मनाची असणार असा तथ्याच्या जवळ जाणारा अंदाज लगेच बांधता येतो. एच. आय. व्ही. असलेल्या मुलांसाठीही असं शिबीर घेतलं जातं. त्यात एकदा एका मुलीने आपल्या नावापुढे 'फुलपाखरू' असं नाव लावलं होतं. संवादकांना वाटलं की ही काहीतरी छान सांगेल. म्हणजे फुलपाखरू खूप रंगांचं असतं, मोकळं उडतं असं काहीतरी. याउलट ती मुलगी म्हणाली की जसं फुलपाखराचं आयुष्य अवघ्या काही दिवसांचं असतं तसंच एच. आय. व्ही. असल्याने आमचं आयुष्य पण लहान आहे, म्हणून 'फुलपाखरू'! हे हेलावून टाकणारं होतं. यातून मुलांना कश्याबद्दल काय वाटतं हे सुद्धा कळतं. काही वेळा मुलं नुसतंच 'मला आवडतं' असं म्हणतात. अशी मुलं बहुतेक वेळा लाजऱ्या स्वभावाची असतात. त्यांना थोडंसं प्रोत्साहन दिलं की ही लाजरी मुलं सुद्धा एकदम खुलतात.
काही शिबिरात मुलं थोडी वयाने मोठी असतात. अश्यावेळी किंवा अंगणवाडी सेविकांच्या शिबिरात आपल्या नावासमोर फक्त आपल्या आईचं नाव सांगायचं आणि आपल्या आईबद्दल थोडंसं काहीतरी बोलायचं असं आम्ही ठरवतो. आपल्या नावापुढे बाबांचं नाव आपण हमखास लावत असतो. पण ज्या आईकडून आपण जन्म घेतला त्या आईचं नाव लावणं ही
संवादकांच्या प्रशिक्षणासाठी घेतलेल्या एका शिबिरात तर आम्ही आमच्या नावापुढे आम्हाला आवडणाऱ्या पुस्तकाचं नाव सांगितलं होतं आणि त्या पुस्तकाविषयी थोडंसं बोललो होतो. माझ्या नावापुढे मला अनेक पुस्तकं लावावीशी वाटतात. कधी 'रेणुका वनवास' असं म्हणावं. कधी 'रेणुका Memories of a Dutiful Daughter' असं म्हणावं वाटतं. कधी 'पाडस', कधी 'हिरवे रावे' आणि असं बरच काही!
पण कोणत्या शिबिरात ओळख करून देण्याची कोणती पद्धत वापरायची याची फार काळजी घ्यावी लागते. अनाथ मुलांच्या संस्थेत तुमच्या आईच नाव सांगायची पद्धत वापरून चालत नाही. त्याने मुलं प्रचंड हर्ट होऊ शकतात. रादर ते आपल्या आईचं नाव सांगूच शकत नाहीत.
या नावाचे बॅजेस करायला मुलांना सांगितलं जातं. त्यासाठी त्यांनी रंग वापराचे असतात. आसपास दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी आपण वापरु शकतो. फक्त निसर्गाची नासधूस करून किंवा कोणतीही गोष्ट पैसे देऊन विकत आणायची नाही अश्या दोन अटी असतात. टाकाऊ वस्तूतून बॅज बनवायचा आणि तो खांद्यावर किंवा छातीवर लावायचा. मुलं फार भारी डोकं लढवतात. 'ढग' असलेला मुलगा घरातला कापूस वापरतो. 'सूर्य' असलेली मुलगी बॅजवर सूर्य काढते, त्याला रंगवते. संपूर्ण शिबीरभर मुलं या नव्या नावाने ओळखली जातात. त्यांना ते आवडतं कारण ही ओळख त्यांनी स्वतः विचार करून निवडलेली असते.
- रेणुका
पण कोणत्या शिबिरात ओळख करून देण्याची कोणती पद्धत वापरायची याची फार काळजी घ्यावी लागते. अनाथ मुलांच्या संस्थेत तुमच्या आईच नाव सांगायची पद्धत वापरून चालत नाही. त्याने मुलं प्रचंड हर्ट होऊ शकतात. रादर ते आपल्या आईचं नाव सांगूच शकत नाहीत.
या नावाचे बॅजेस करायला मुलांना सांगितलं जातं. त्यासाठी त्यांनी रंग वापराचे असतात. आसपास दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी आपण वापरु शकतो. फक्त निसर्गाची नासधूस करून किंवा कोणतीही गोष्ट पैसे देऊन विकत आणायची नाही अश्या दोन अटी असतात. टाकाऊ वस्तूतून बॅज बनवायचा आणि तो खांद्यावर किंवा छातीवर लावायचा. मुलं फार भारी डोकं लढवतात. 'ढग' असलेला मुलगा घरातला कापूस वापरतो. 'सूर्य' असलेली मुलगी बॅजवर सूर्य काढते, त्याला रंगवते. संपूर्ण शिबीरभर मुलं या नव्या नावाने ओळखली जातात. त्यांना ते आवडतं कारण ही ओळख त्यांनी स्वतः विचार करून निवडलेली असते.
- रेणुका


